माणिकचंद ग्रुपचे पुणे येथील नोंदणीकृत कार्यालय, ‘माणिकचंद हाऊस'

प्रकाश धारिवाल : उद्योगविश्वातील बहुपेडी व्यक्तिमत

धारिवाल उद्योग समूहाचा खाद्यान्न क्षेत्रात प्रवेश; पॅकेजिग व्यवसायाचा विस्तार. रसिकलाल माणिकचंद धारिवाल हे नाव गल्लीपासून दिल्लीपर्यंत परिचित होते आणि आजही आहे. शिरूरस्थित धारिवाल कु टुंबियांनी अतिशय हालाखीच्या परिस्थितीतून सावरत वाहतूक आणि वडिलोपार्जित तंबाखू व्यवसायातून उद्योग-व्यवसाय जगतामध्ये आपले एक अढळ स्थान निर्माण के ले आहे. रसिकशेठ यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र प्रकाश धारिवाल व्यवसायाची धुरा यशस्वीरित्या सांभाळत आहेत. पारंपरिक व्यवसायासह प्लॅस्टिक पॅकेजिंग आणि एफएमसीजी व्यवसायावर प्रकाश रसिकलाल धारिवाल यांनी भर दिला आहे. सर्वोत्तम वितरण साखळीसह ग्राहकांच्या गरजा ओळखून उच्च दर्जाची उत्पादननिर्मिती करणाऱ्या धारिवाल उद्योग समूहाची भविष्यातील वाटचाल कशी असेल याबाबत प्रकाश धारिवाल यांच्याशी के लेली चर्चा...

शिरूरमधील धारिवाल कुटुंबातील रसिकलाल हे व्यवसायानिमित्त पुण्यात आले ते १९७८ मध्ये. नाना पेठेत २२५ चौरस फुटांचे एक छोटेसे दुकान त्यांनी घेतले व तेथून ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला. त्या वेळी त्यांच्याकडे ४० ट्रक होते. तर दुसरीकडे वडिलोपार्जित व्यवसायाला उभारी देण्यासाठी सुगंधी तंबाखूची संकल्पना त्यांनी बाजारात सादर केली होती. उत्तरप्रदेश, बिहार या भागांत अशा उत्पादनांची मोठी बाजारपेठ होती. ती हेरून रसिकलाल यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण बाजारपेठ काबीज करण्याचे स्वप्न पाहिले. याच दरम्यान त्यांचे सुपुत्र प्रकाश धारिवाल यांनाही त्यांनी शिक्षणासाठी पुण्यात आणले. बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून (बीएमसीसी) १९८६ मध्ये बी.कॉम. पदवी संपादन करीत प्रकाश यांनी वडिलांना व्यवसायात हातभार लावण्यास सुरुवात केली.

पट आठवणींचा…

प्रकाश धारिवाल यांना एकूण तीन बहिणी असून, त्यापैकी एक दुबईमध्ये स्थायिक झाल्या आहेत. आई-वडिलांच्या आठवणी सांगताना प्रकाश धारिवाल म्हणाले, ‘‘माझी आई तशी फार शिकलेली नव्हती. त्यांचे लग्न १९५६ मध्ये अगदी कमी वयात झाले होते. खेडेगावात वाढलेल्या आईने आमच्या कुटुंबासाठी सर्वस्व दिले. वडील १४ वर्षांचे असताना माझ्या आजोबांचे आकस्मात निधन झाले. त्या वेळी आमची परिस्थिती बिकट होती. माझी आजी मात्र हुशार होती. तिने शिरूरमध्ये स्टेशनरीचा व्यवसाय सुरू केला. त्यातून काही प्रमाणात उत्पन्न मिळायला लागले. त्या वेळी शालेय शिक्षण घेत असलेले रसिकलाल दहावीनंतर व्यवसायात उतरले. वडिलोपार्जित व्यवसाय वाढविण्यासाठी त्यांनी तेव्हापासून कष्ट घेतले. त्यानंतर नाना पेठेत दुकान घेतले आणि या शहरात स्थायिक झाले. पुण्यात घर असूनही मी दोन वर्षे होस्टेलवर राहत होतो. माझ्या वडिलांनी मला मुद्दाम तेथे राहायला पाठविले होते. स्वतंत्रपणे परंतु जबाबदारीने जगण्याची त्यांनी मला शिकवण दिली. सकाळी साडेसात ते दुपारी बारापर्यंत महाविद्यालयात व त्यानंतर दुपारी तीन ते चार दुकानात, असा माझा दिनक्रम असायचा. व्यवसायाची गोडी लागावी यासाठी ते मला ऑफिसमध्ये बोलावून घेत. व्यवसाय करताना लोकांशी कसे बोलावे, आपले आचरण कसे असावे, उत्पादनाच्या गुणवत्तेशी कधीही तडजोड करू नये, अशा अनेक गोष्टी त्यांनी मला त्या काळात शिकविल्या. ते कठोर शिस्त पाळत असत. त्या वेळी त्यांचे वागणे, बोलणे थोडे कठोर वाटत असे, पण आज त्याचे महत्त्व पदोपदी पटते. आम्ही आज व्यवसायात स्थिरस्थावर आहोत ते केवळ त्यांच्या मार्गदर्शन व शिकवणीमुळेच.’’

हैदराबाद येथील अत्याधुनिक रोलर फ्लोअर मिल

‘‘तंबाखूचा व्यवसाय पूर्णपणे सरकारी नियमांवर अवलंबून होता व आहे. महाराष्ट्रात जेव्हा आमच्या व्यवसायावर गदा येत असल्याचे संकेत मिळाले, तेव्हाच माझ्या वडिलांनी अन्य व्यवसायात उतरण्याचे ठरविले. तत्पूर्वी त्यांनी १९८५ मध्ये खडकी येथे ‘खोसला प्लॅस्टिक’ आणि ‘खोसला मेटल पावडर’ या दोन फॅक्टरी विकत घेतल्या होत्या. रसिकलाल यांनी औद्योगिक क्षेत्रात टाकलेले हे पहिले महत्त्वाचे पाऊल होते. मात्र कुशल तांत्रिक मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्यामुळे ‘खोसला मेटल पावडर’ हा कारखाना बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. ‘खोसला प्लॅस्टिक’ हा कारखाना आजही कार्यरत आहे. रेल्वेसह अन्य उद्योगक्षेत्रांमध्ये लागणारी इलेक्ट्रिकल स्विच, प्लग, सॉकेट, रेग्युलेटर इत्यादी उत्पादनांची निर्मिती त्या कारखान्यात केली जाते. याव्यतिरिक्त सावंतवाडीजवळ एक ऑक्सिजन प्लँट, घोडनदी येथे एक पॅकेजिंग प्लँट आणि पवनऊर्जा प्रकल्पातही त्यांनी गुंतवणूक केली. गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थान येथे पवनऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले. शिरूर येथे एक मेगावॅटचा सोलर प्रकल्पही सुरू केला. पॅकेजिंग प्लँटमध्ये औरंगाबाद, जालना, हैदराबाद येथील विविध बियाण्यांच्या कंपन्या, अन्नपदार्थ कंपन्या, फार्मास्युटिकल कंपन्यांची प्रिंटिंगची कामे घेतली जातात. शिरूरजवळ सरदवाडीमध्ये ‘माणिकचंद पॅकेजिंग’ नावानेदेखील कारखाना आहे. तेथे तीन स्तरांचे (थ्री लेयर) पॅकिंग केले जाते. या कारखान्याचाही विस्तार आम्ही लवकरच करणार आहोत.’’

‘ऊंचे लोग, ऊंची पसंद’ ही टॅगलाईन धारिवाल कुटुंबीयांच्या व्यावसायिक प्रवासामध्ये अत्यंत महत्त्वाची आणि दिशादर्शक ठरली. हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांसाठी असलेल्या प्रतिष्ठेच्या फिल्मफेअर पुरस्काराच्या कार्यक्रमांचे प्रायोजक होणे, हीदेखील अशीच एक महत्त्वाची घटना. प्रकाश धारिवाल यांच्या मते, कोणत्याही उत्पादनाची ओळख ही त्याच्या गुणवत्तेवरूनच निर्माण होते. आमच्या उत्पादनांची टॅगलाईन ठरविताना आम्ही या गोष्टीचा विचार करूनच ती लोकांसमोर सादर केली. याचा सकारात्मक परिणाम असा झाला, की ते वाक्य आजही कोणी ऐकले किंवा बोलले, तर त्याला आमच्या उत्पादनाची आठवण येते, असे ते अभिमानाने सांगतात.

यशाचा गुरुमंत्र

प्रकाश धारिवाल म्हणाले, ‘‘माझ्या वडिलांनी अत्यंत मेहनत घेऊन ‘माणिकचंद’ हा ब्रँड तयार केला व नावारूपाला आणला. तसे पाहिले तर ते केवळ दहावी उत्तीर्ण होते, पण त्यांचा व्यावसायिक विषयांचा आणि क्षेत्राचा अभ्यास दांडगा होता. त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी कधीही उधारीवर व्यवसाय केला नाही. कार्यालयातील असो किंवा कारखान्यातील, प्रत्येक कर्मचाऱ्याचा आणि त्याच्या कुटुंबीयांचा विचार माझ्या वडिलांनी नेहमी केला. कार्यालयीन, तसेच तांत्रिक कर्मचारी हे आमचे एक विस्तारलेले कुटुंबच बनत गेले. माझे वडील नेहमी सांगत, की ज्या विषयात आपल्याला समजते, त्यातच काम केले पाहिजे. ऑक्टोबर २०१७ मध्येनिधन होण्यापूर्वीही माझे वडील दिवसाला तब्बल १४ ते १५ तास काम करीत होते. व्यवसाय करताना कधीही चुकीचे काम करायचे नाही, आपला व्यवहार चोख ठेवायचा, हिशोब करताना किंवा पैशांची देवाण-घेवाण करताना कोणाकडून एक रुपयाही कमी घ्यायचा नाही किंवा कोणाला द्यायचा नाही, अशी शिकवण त्यांनी आम्हाला दिली.’’

नाशिक येथे ‘श्री. प्रकाशजी रसिकलालजी धारिवाल कार्डीॲक केअर सेंटर’चे मा. ना. नितीनजी गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण

‘‘काही सरकारी धोरणांमुळे २००३ मध्ये शिरूर येथील कारखाना बेंगळूर येथे हलविण्याचा निर्णय वडिलांनी घेतला होता. त्या काळी बेगळूर शहराच्या बाहेर, परंतु औद्योगिक वसाहत नसलेल्या ठिकणी हा कारखाना होता. पण आता तेथे नागरी वस्ती वाढल्यामुळे तो कारखाना आता औद्योगिक वसाहतीच्या क्षेत्रामध्ये स्थलांतरित केला आहे. मात्र या उत्पादनासाठी लागणारे कंपाउंडिंग मटेरियल आजही शिरूर येथेच बनते. बडोदा येथे असलेल्या एका युनिटमधून सर्व उत्पादन हे अधिकृतरीत्या निर्यात केले जाते. दक्षिण आफ्रिका, अमेरिका, युरोप इत्यादी भागातील देशांमध्ये हे उत्पादन निर्यात केले जाते. वडिलांनी अत्यंत मेहनतीने उभा केलेला हा उद्योगाचा वटवृक्ष आता आणखी बहरणार आहे. वडिलांनी कष्टाने उभ्या केलेल्या या व्यवसायाचा विस्तार आता आम्ही करणार असून, वडिलांचे नाव आम्हाला मोठे करायचे आहे. रसिकलाल यांनी व्यवसायाबरोबरच दान व सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात केले आहे. आपण जे पैसे कमवतो त्यापैकी काही भाग हा समाजाच्या उपयोगासाठी वापरला गेला पाहिजे, असे त्यांचे मत होते. विविध सामाजिक संस्था, मंदिरे, शैक्षणिक संस्था, रुग्णालयांना त्यांनी भरभरून सामाजिक उत्तरदायित्वाच्या दृष्टिकोनातून निधी दिला. वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवून प्रवास करायचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही नुकतीच ‘पी. आर. धारिवाल फाउंडेशन’ची स्थापना केली आहे,’’ असेही प्रकाश धारिवाल यांनी सांगितले.

भविष्यातील वाटचाल

प्रकाश धारिवाल यांचा मुलगा आदित्य आणि मुलगी साक्षी सध्या परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत. ही नवी पिढी लवकरच व्यवसायात हातभार लावणार आहे. प्रकाश धारिवाल यांना ज्या पद्धतीने कॉलेज सुरू असतानाच व्यवसायाची ओळख व गोडी लागावी यासाठी दुकानावर बोलावले जायचे, तसेच प्रशिक्षण आपल्या मुलांना त्यांनी दिले. महाविद्यालयातील वर्ग संपल्यावर त्यांना कार्यालयात येण्यास सांगितले जाई. पण कार्यालयात आल्यावर लगेच केबिनमध्ये बसण्याची त्यांना परवानगी नव्हती. अन्य कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने ते बसत आणि आपले काम शिकून घेत व पूर्ण करीत. ‘‘साक्षी परदेशातून पॅकेजिंग प्लँटचा संपूर्ण व्यवसाय हाताळत आहे. दोघेही मला भविष्यात व्यवसाय विस्तारासाठी हातभार लावतील, यात काहीच शंका नाही,’’ असे प्रकाश धारिवाल यांनी सांगितले.

भविष्यातील व्यवसाय विस्ताराबद्दल बोलताना प्रकाश धारिवाल म्हणाले, ‘‘सध्या आम्ही हैदराबाद येथे माणिकचंद रवा, आटा आणि मैदा या उत्पादनांसंदर्भात कारखाना कार्यान्वित केला आहे. गेली अनेक वर्षे या उत्पादनांची विक्री विविध बाजारपेठांमध्ये यशस्वीरीत्या होत आहे. पूर्वी बल्कमध्ये म्हणजे २५ आणि ५० किलोच्या क्षमतेच्या पॅकमध्ये ही उत्पादने उपलब्ध होती, मात्र साधारण पाच वर्षांपूर्वी आम्ही ५ किलो व १० किलो वजनाच्या अशा छोट्या पाकिटांच्या आकारातही ही उत्पादने बाजारात आणली आहेत. लवकरच महाराष्ट्रासह देशातील सर्व राज्यांच्या बाजारपेठांमध्ये ही उत्पादने लाँच केली जाणार आहेत.’’

रेडी-टू-ईट या प्रकारात मोडणाऱ्या खाद्यपदार्थांच्या क्षेत्रातही प्रकाश धारिवाल आता प्रवेश करणार आहेत. ‘‘पास्ता, पोहे, उपमा, इडली आणि मेदूवडा मिक्स अशी काही उत्पादने आम्ही लवकरच बाजारात आणणार आहोत. सध्या या उत्पादनांची गुणवत्ता चाचणी वेगळ्या नावाने सुरू आहेत. या चाचण्यांचे निष्कर्ष ९५ टक्केसमाधानकारक आले आहेत. देशभरातील विविध शहरांच्या बाजारपेठांमध्ये ही उत्पादने वेगवेगळ्या ब्रँडनेमच्या साहाय्याने सादर केली जाणार आहेत. तीन नावांची नोंदणी करण्यात आली आहे. तसेच ‘ऊंचे लोग, ऊंची पसंद’ या टॅगलाईनचेही स्वामित्व हक्क आम्ही मिळविले आहेत. येत्या सहा ते आठ महिन्यांत ती लाँच करण्याचा आमचा मानस आहे,’’ असे प्रकाश धारिवाल यांनी सांगितले.

‘‘वडिलोपार्जित व्यवसायापासून अंशतः फारकत घेऊन एक सामाजिकदृष्ट्या जबाबदार उद्योग समूह म्हणून आम्हाला पुढे यायचे आहे. ग्रेव्योर प्रिंटिंगच्या कारखान्याचा विस्तार आता आम्ही करीत आहोत. बहुराष्ट्रीय कंपन्यांची देशांतर्गत, तसेच परदेशातील कामांसाठी आमच्या कारखान्याची निवड झाल्यामुळे हा क्षमता विस्तार आम्ही करीत आहोत. आठ रंगांच्या प्रिंटिंगसाठी इटलीतून आयात केलेले रोटोग्रेव्योर मशीन आणि स्वित्झर्लंडमधून आणलेली अत्याधुनिक सामग्री यासाठी वापरली जाणार आहे. शिवाय बांधकाम क्षेत्रातही आम्ही आता प्रवेश करीत आहोत. बेंगळुरु येथे एक प्रकल्प आम्ही सुरू केला असून, लवकरच पुण्यातही आम्ही या क्षेत्रात पदार्पण करणार आहोत. सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून पंढरपूर येथे धर्मशाळा बांधत आहोत,’’ अशी माहिती प्रकाश धारिवाल यांनी दिली.

नवउद्योजकांना मार्गदर्शन

नव्याने उद्योग-व्यवसायात येणाऱ्या तरुणांसाठी काय संदेश द्याल, असे विचारले असता प्रकाश धारिवाल म्हणाले, ‘‘व्यवसाय करताना स्पर्धा असणारच आहे. त्यामुळे व्यवहार करताना प्रामाणिकपणे करा आणि कामाची गुणवत्ता राखण्याची जबाबदारी पाळा. व्यवहारामध्ये वाटाघाटी करताना योग्य पद्धतीने करा. कौटुंबिक किंवा पारंपरिक व्यवसायात आला असाल, तर तुमच्या वडिलांनी घालून दिलेल्या व्यावसायिक व्यवस्था बदलण्याची घाई करू नका. त्यामध्येसुधारणा नक्कीच करता येतात, मात्र त्या संपूर्ण बदलून टाकण्याची घाई करू नका. तसेच आपल्या कर्मचाऱ्यांना कुटुंबीयांप्रमाणे वागणूक द्या व त्यांच्या बरोबरीने काम करा.

कोणताही नवीन व्यवसाय सुरू केल्यावर स्थिरस्थावर होण्यासाठी त्याला पुरेसा अवधी द्या. पहिल्या काही महिन्यांतच यश मिळविण्याची घाई करू नका. कर्ज घेऊन व्यवसाय करणार असाल, तर व्यवसायात नुकसान झाले तरी त्या कर्जाची परतफेड कशी करणार, याची तरतूद करून ठेवा. आपले व्यावसायिक, तसेच कौटुंबिक आर्थिक व्यवस्थापन अचूकपणे करा.’’

माणिकचंद पॅकेजिंग, सरदवाडी,ता. शिरुर

माणिकचंद रोलर फ्लोअर मिल्स

माणिकचंद रोलर फ्लोअर मिल्स ही कंपनी दक्षिण भारतातील कंपन्या, स्वीट मार्ट, हाॅटेल्स, तसेच मोठ्या बेकरी यांना पिठाचा पुरवठा करते. पूर्वीची दी हैदराबाद फ्लोअर मिल्स कंपनी लिमिटेड ही साठ वर्षे जुनी कंपनी विकत घेऊन १९९५ मध्ये ही कंपनी स्थापन करण्यात आली. या प्रकल्पात झेकोस्लोव्हाकिया येथील कं पनीने बसवून दिलेल्या अत्याधुनिक प्लँटच्या मदतीने उत्पादन केले जाते. हैदराबादजवळ नचाराम येथे १६ एकर क्षेत्रामध्ये उभ्या असलेल्या या प्रकल्पाची वेगाने वाढ होत आहे.

माणिकचंद पॅकेजिग

‘माणिकचंद पॅकेजिंग’ ही कंपनी फ्लेक्झिबल पॅकेजिंग, कोरोगेटेड बॉक्स, कार्टन व इंक यांचे एकात्मिक उत्पादन करणारे युनिट आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्रीने चालणाऱ्या या कारखान्यात देश-विदेशातील कंपन्यांच्या उत्पादनांसाठी उच्च दर्जाचे पॅकेजिंग सोल्यूशन दिले जातात. १९९९ मध्ये सुरू झालेल्या या कारखान्यात प्री-प्रेस, एन्ग्रेव्हिंग, प्रूफिंग, प्रिंटिंग, पाऊच व स्लीव्ह मेकिंगची सुविधा आहे. ग्रेव्युर प्रक्रियेच्या साहाय्याने हाय-बॅरियर फिल्मवर ८ रंगांमध्ये प्रिंटिंग करण्याची सुविधा या कारखान्यात आहे. तसेच आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने लॅमिनेट पॅकेजिंग करून देण्याची सोयही या कारखान्यात आहे.

अक्षय ऊर्जाक्षेत्रात दमदार कामगिरी

‘धारिवाल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड’मार्फत अक्षय ऊर्जा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक

गुजरातमधील पोरबंदर, महाराष्ट्रातील सातारा आणि राजस्थानमधील जैसलमेर येथील १०८ पवनचक्क्यांमार्फत ६० मेगावॅट वीजनिर्मिती

सुझलाॅनच्या ९० विंड टर्बाईन जनरेटरमधून दरवर्षी ८२.६ दशलक्ष किलोवॅट-अवर वीजनिर्मिती

१८ एनईपीसी विंड टर्बाईन जनरेटरमधून दरवर्षी ३.६ दशलक्ष किलोवॅट-अवर वीजनिर्मिती

प्रकाश धारिवाल पत्नी सौ. दीना, चिरंजीव आदित्य आणि कन्या साक्षी यांच्यासह
मराठी